। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई लोकल खाली दोन म्हशी अडकल्याची घटना घडली असून, यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी गेल्या तासाभरापासून रेल्वे वाहतूक सेवा खोळंबली असून प्रवाशांचे हाल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांगणी-बदलापूर दरम्यान ही घटना घडली. बदलापूर ते कर्जत मार्गावर अप दिशेवर मुंबईकडे जाणारी लोकल वांगणी बदलापूर दरम्यान गोरेगाव येथे खोळंबली आहे. सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी ही लोकल वांगणीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र त्याचवेळी काही म्हशी रेल्वे ट्रॅकवरून जात असताना त्यातील दोन म्हशी लोकल खाली सापडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान, घटनेची माहिती मदतकार्य पथकाला देताच सध्या या म्हशी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कामावर किंवा इतर ठिकाणी निघालेल्या प्रवाशांना लेट मार्क लागत आहे.







