। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा येथे राहणारा यासीन बोंबे हा गेल्या पाच वर्षांपासून तळोजा येथून कलिंगड घेऊन कामोठे हद्दीमध्ये एका कोपर्यात त्याच्या जवळ असलेली दोन बैलाची बैलगाडी उभी करून कलिंगड विक्रीचा व्यवसाय करीत आहे. यावेळी कलिंगड विक्रीचा व्यवसाय दिवसभर झाल्यानंतर सायंकाळी बोंबे हा हद्दीतील आयकर कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर बैलगाडी व दोन्ही बैल बांधून ठेवायचा आणि तळोजा येथे जायाचा नेहमीप्रमाणे बोंबे हा दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी आपल्या घरी निघून गेला व दुसर्या दिवशी त्याठिकाणी आला. यावेळी दोन्हीही बैल त्याला दिसले नाही, त्यांचा शोध घेतला असता बाजूलाच एक इंजेक्शन पडलेले दिसले, व दोन्ही बैल मृत अवस्थेत असल्याचे दिसले, यावेळी बोंबे यांनी तात्काळ कामोठे पोलीस ठाणे गाठत या प्रकारची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर भेट देत माहिती घेत प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.






