। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापुरात दोन चिमुकल्या बहीण-भावांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. फ्रिजमध्ये ठेवलेला केक खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूरातील कागल तालुक्यातील चिमगाव या गावी हि दुर्घटना घडली आहे. श्रीयांश रणजीत आंगज (5) आणि काव्य रणजीत आंगज (8) अशी दोघांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीयांश आणि काव्य या दोघांनी शिळा केक खाल्ल्याने त्यांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणू लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच श्रीयांशला जास्त त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर काव्य हिलादेखील त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे सायंकाळी तिला मुरगुड इथल्या खाजगी दवाखान्यात दाखल आले. पण, ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मुरगुड पोलीस अधिक तपास करत आहेत.