मूनवलीतील तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात रविवार, (दि.23) जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन मुलांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूनवली पंचक्रोशितील आठ मुलांचा ग्रुप मूनवली येथे वर्षासहलीसाठी आला होता. त्यातील अथर्व शंकर हाके, वय अंदाजे 16 वर्षे व शुभम विजय बाला, वय अंदाजे 15 वर्षे हे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील काही मुलांनी प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेऊन मुलांना शोधण्यात मेहनत घेतली असता त्यांना साधारण दोन तासांनी यश मिळाले. यामध्ये अथर्व हाके, रा. मूनवली याला प्रथम शोधून बाहेर काढले, तर शुभम विजय बाला, रा. तुडाळ याला सुमारे अर्ध्या तासाने बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस घटनास्थळी हजर होते. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. घटना घडल्यानंतर घटनास्थळी पंचक्रोशितील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version