| पुणे | प्रतिनिधी |
पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाठी आणि एका तरूणीचा मृतदेह दरीत आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. सध्या श्रीगोंदा जि. अहिल्यानगर येथे महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या व मूळ गाव हातवीज असलेल्या रामचंद्र साहेबराव पारधी (40) व आंबोली ता. जुन्नर येथील रूपाली संतोष खुटान (17), अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली ही रामचंद्र याच्या मेहुणीची मुलगी होती. पारधी याची मोटार कोकण कड्यावर तीन-चार दिवसांपासून उभी असल्याचे, तसेच कड्यावर पायातील चपला जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. कड्याच्या खोल दरीत पाहिल्यानंतर सुमारे बाराशे फुटावर मृतदेह दिसून आला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांच्या पथकाने सोमवारी (दि.23) सांयकाळी उशिरा दोन्ही मृतदेह खोल दरीतून वर काढले. यात रूपाली हिचा मृतदेह बाराशे फुटांवर, तर रामचंद्र याचा तेराशे पन्नास फुटावर मिळून आला. दरम्यान, रूपाली हिचे अपहरण झाले असल्याची तक्रार15 जून रोजी जुन्नर पोलिसांकडे दाखल असल्याचे सांगण्यात आले. रूपाली हिने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ती समाज माध्यमात प्रसारित केली होती. यात आई व वडिलांसह नातेवाईक छळ करत असल्याचे नमूद केले असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलिस पुढील तपास करत आहेत.






