मेंदडी-खरसई हमरस्त्यावर सलग दोन अपघात; महिलेचा मृत्यू

। म्हसळा । प्रतिनिधी ।

म्हसळा तालुक्यातील मेंदडी-खरसई हमरस्त्यावर रविवारी (दि. 3) दोन वेगवेगळे अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. यातील दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या अपघातात पर्यटकांचे प्राण थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या अपघातात पल्सर दुचाकीवरील सुमन नामदेव शिवणे (42) रा. नानवली, श्रीवर्धन यांचा मृत्यू झाला. त्या आपल्या भाचा शैलेश हांडे (30) यांच्यासोबत वडवली येथून म्हसळा मार्गे मुंबईकडे जात असताना मेंदडी येथील तीव्र वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात सुमन शिवणे गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना तत्काळ म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या वळणावर गेल्या पाच महिन्यांत पाच गंभीर अपघात झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे या धोकादायक ठिकाणी शासनाने तातडीने पर्यायी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान दुसरा अपघात खरसई गावाजवळ घडला. पर्यटकांची भरधाव कार ओव्हरटेक करताना रस्त्याबाहेर जाऊन शेतात जाऊन उभी राहिली. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही घटनांची नोंद म्हसळा पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version