। संगमनेर । प्रतिनिधी ।
संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान एक दुर्घटना घडली आहे. विषारी वायूने गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अतुल रतन पवार (वय 19, रा. संजय गांधीनगर) व रियाज जावेद पिंजारी (22) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत शहरात भूमिगत गटाराचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरात जागोजागी भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. कोल्हेवाडी रस्त्यावर काम सुरू असलेल्या गटारात उतरलेल्या अतुल पवार आणि रियाज पिंजारी या कामगारांना विषारी वायूमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हे दोघे गटारात बेशुद्ध झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य राबवून दोघांना गटारातून बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर अतुल पवार यास मृत घोषित करण्यात आले, तर रियाज पिंजारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. तर या घटनेमुळे भूमिगत कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.