। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील पागोटे गावाजवळील पुलाजवळ शनिवारी (दि. 12) दुपारी भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या एका तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दोघेही नवी मुंबई परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र एवढं भीषण अपघात घडूनही प्रशासनाचे मौन आणि अपघाताचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
अपघातानंतर पुलावरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुण-तरुणीला वेळेवर मदतीचा हात कुणीच दिला नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला असला, तरी अपघाताचे नेमके कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अपघातातील दोन्ही मृतदेह उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलवण्यात आले असून, पुढील तपास उरण पोलीस करत आहेत.
उरण परिसरात अपघातांची मालिका आता सवयीची झाली आहे. दर महिन्याला कोणी ना कोणी या रस्त्यांवर जीव गमावत आहे. परंतु, त्यासाठी ना पुलावर गतिरोधक, ना सीसीटीव्ही, ना वेगमर्यादा यंत्रणा सर्वकाही रामभरोसे सुरू आहे. प्रशासनाला फक्त अपघातानंतर प्रेसनोट काढायला वेळ आहे, मात्र याआधी उपाययोजना करायला वेळ नाही.







