वीज पडून दोघांचा मृत्यू

। नागपूर । प्रतिनिधी ।

रविवारी (दि.13) दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान गारपिटीसह झालेल्या वादळी पावसादरम्यान काटोल तालुक्यातील आलागोंदी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीतील आलागोंदी येथील गोविंदराव पंचभाई यांच्या घरी रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातीलच एक कंदुरी हा कार्यक्रम त्यांच्या शेतात सुरू असतानाच दुपारी दीडच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाहुण्यांनी विविध ठिकाणी आश्रय घेतला. भागवतराव भोंडवे व जयदेव मनोटे हे शेतातील एका झाडाखाली थांबले. मात्र, नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली आणि त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

कोंढाळी पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी, पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख, एएसआय राजकुमार कोल्हे, सुनील बनसोड व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

Exit mobile version