। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील पवना डॅममध्ये बोट उलटल्याने दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह शोधून काढले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
पुण्यातील पवना डॅममध्ये बुधवारी (दि. 04) आठ मित्र फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी काही मित्र हे तेथील एका खासगी बोटीत बसून धरणातून फेरफटाक मारण्यासाठी गेले होते. त्याचवेळी फिरायला गेलेल्या तरूणांपैकी एकाची बोट उलटल्याने तो पाण्यात कोसळला आणि पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या बोटीतील त्याच्या मित्राने पाण्यात उडी मारली आणि बुडणाऱ्या तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवघ्या काही वेळातच ते दोघेही तरूण पाण्यात बुडाले. हा सर्व दुर्दैवी प्रकार तेथील उपस्थितांच्या मोबाईलमध्ये कैद झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग बचाव पथक आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दोन दिवस शोध मोहीम राबवत धरणामधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे अशी मृतांची नावे असून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.