अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

। पनवेल । वार्ताहर ।

कळंबोली भागात एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत अमली पदार्थ विरोधी पथकाने 56 ग्रॅम वजनाचे 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केले आहे.

एक व्यक्ती कळंबोली सेक्टर-11 मधील गुरुद्वारासमोर अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मोरे व त्यांच्या पथकाने कळंबोलीतील गुरुद्वाराजवळ सापळा लावला होता. याठिकाणी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास मोहसीन फारुख झरीवाला (34) हा संशयास्पदरीत्या आला असता, अमली पदार्थविरोधी पथकाने त्याची धरपकड करून त्याच्याजवळून 56 ग्रॅम वजनाचे 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त केले. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने मोहसीन याच्याजवळ सापडलेले अमली पदार्थ जप्त करून त्याची कसून चौकशी केली असता, त्याला सदरचे अमली पदार्थ कळंबोलीत राहणार्‍या इम्तियाज नियाज अहमद खान (33) याने दिल्याची माहिती दिली. त्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने त्यालादेखील ताब्यात घेतले. त्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने मोहसीन झरीवाला व इम्तियाज खान या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

Exit mobile version