चोरी करणाऱ्या ‘त्या’ दोन महिला पोलिसांच्या जाळ्यात

खोपोली पोलिसांची कामगिरी; चोरीचा मुद्देमाल हस्तगत
| रायगड | प्रतिनिधी |
खोपोली बाजारपेठ येथे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या दोन महिलांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रुपये सात हजार आठशे सहित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. पुनम जितेश सकट, सुनिता अशोक राखपसरे (दोन्ही रा.घुले वस्ती, महादेव नगर, मांजरी, जि.पुणे) असे या दोन महिलांची नावे आहेत.

अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर या दोन महिला खोपोली बाजारपेठेमध्ये वेगवेगळया ठिकाणी रस्त्यावरील विक्री करीत होत्या बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखीमहिलांनी विक्री करीत असलेल्या महिलांच्या पर्समधील अनुक्रमे 3,800 रुपये व 4,000 असे एकूण 7,800 रुपये रोख रक्कम, मुळ आधारकार्ड, बँकांचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रे असा मुद्देमाल चोरून नेला होता.

अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर या महिलांनी खोपोली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. घडलेल्या गुन्हयाची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार महिला पोलीस नाईक पी.एस.कांबळे, बिट मार्शल्स पोलीस शिपाई अमोल राठोड व पोलीस शिपाई राजेश चौहान यांनी शितल राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरीत तपास केला. चोरी करणाऱ्या महिला पुनम जितेश सकट, सुनिता अशोक राखपसरे यांना रंगेहाथ पकडण्यात खोपोली पोलीसांना यश आले आहे.

Exit mobile version