ई-पॉस मशीनला तांत्रिक अडचणी, ग्राहकांसह दुकानदारांचाही संताप
| चौल | प्रतिनिधी |
रेशन धान्य दुकानातून वितरीत होणारे मोफत धान्यांचे डिसेंबर महिन्याचे वितरण राज्यात ठप्प झाले आहे. एक-दोन दिवस नव्हे, तर गेले दहा दिवस ई-पॉस मशीनला तांत्रिक अडचण येत असल्याने जिल्ह्यात विविध योजनांतील तब्बल साडेसतरा लाख लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित आहेत. धान्यासाठी दररोज हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे कार्डधारक ग्राहकांसह दुकानदारांतही संतापाचे वातावरण आहे. टू-जी गेले आणि फोर-जी आले, पण वितरणातील समस्या कायम असल्याने लाभार्थ्यांसह दुकानदारही त्रासले आहेत.
रायगड जिल्हह्यातील 15 तालुक्यांमध्ये एकूण 1,446 रास्त भाव दुकाने आहेत. रायगड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक 81,419 असून, लाभार्थी संख्या 2,53,048 इतकी आहे. प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांची संख्या 3,37,192 एवढी असून, 15,08,561 लाभार्थी आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबं योजनेतील लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ मोफत दिला जातो. याकरिता हे धान्य संबंधित दुकानदारापर्यंत महिन्याअखेरपर्यंत पोहोचवले जाते. यानंतर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मोफत धान्याचे रेशनधान्य दुकानातून वितरण सुरू होते. महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत बहुतांशी सर्व कार्डधारकांना धान्य वितरीत होते.
डिसेंबर महिन्यासाठीचे धान्य दुकानदारांपर्यंत जमा झाले आहे. मात्र, त्याचे ई-पॉस मशीनला आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे वितरण सुरू झालेले नाही. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती असल्याने अद्याप एकाही जिल्ह्यात या महिन्याचे धान्याचे वितरण सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तालुका पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे धान्यपुरवठा कधीपासून सुरळीत होईल, याविषयी अनिश्चितता कायम आहे.
कार्डधारक-दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग
दर महिन्याच्या तीन ते चार तारखेपासून धान्य मिळायला सुरुवात होते. यामुळे पहिन्या आठवड्यात धान्य नेण्यासाठी दुकानात येणार्या कार्डधारकांची संख्या अधिक असंते. या महिन्यातही ग्राहक दुकानात येत आहेत. मात्र, धान्य मिळत नसल्याने ते रिकामे हाती परत जात आहेत. ई-पॉस मशीन कधी सुरु होईल, हे सांगता येत नसल्याने अनेकांचे वारंवार हेलपाटे होऊ लागले आहेत. त्यातून अनेक ठिकाणी कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रसंग होत आहेत. यामुळे कार्डधारकांबरोबर दुकानदारही संतापले आहेत.
नवी ई-पॉस असूनही अडचणी कायम
धान्य दुकानादारांना 4-जी तंत्रज्ञान असेलली नवीन ई-पॉस मशीन दिली आहेत. मात्र, यूपर्वीच्या जुन्या मशीनबाबत असणार्या अडचणी आता या नवीन मशीनलाही येऊ लागल्या की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. मशीन नवीन आल्यानंतरही अडचणी कायम असल्याचे चित्र आहे.
शासनाने राज्यातील पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे कामकाज सुधारण्यासाठी संपूर्ण राज्यातील नवीन एलएईऐसीएम ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. तसेच, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाचे क्लाऊड सर्व्हर, जे पूर्वी खासगी कंपनीकडे होते, ते आता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी)कडे स्थानांतरित करण्यात आले आहे. ई-पॉस मशीनवरदेखील आधार प्रमाणीकरणासाठी यूआयडीएआय सर्व्हरला या सर्व समस्यांचे निराकरण होऊन धान्यपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
कौस्तुभ जोशी,
सचिव, अलिबाग तालुका, रास्त भाव दुकानदार संघटना
मंत्रालयातून आलेला मॅसेज..
आम्हाला माहीत आहे की, धान्यवितरणात समस्य येत आहेत. सध्या आम्ही आमच्या सिस्टीम र्ऊीीश क्लाऊडवरुन छळल क्लाऊडवर स्थलांतरित करीत आहोत. त्यामुळे प्रणाली स्थिर होण्यासाठी एक-दोन दिवस लागतील. तसेच आधार कनेक्टिव्हिटी समस्या आहेत. त्यामुळे कृपया सहकार्य करा.
दुकानात धान्याचा साठा आहे, परंतु ई-पॉस मशीनमध्ये मागील दहा दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे वितरणात अडथळा निर्माण होत आहे. धान्यासाठी ग्राहक वारंवार हेलपाटे मारत आहेत. परंतु, रिकाम्या हाती परत जावे लागत असल्यामुळे अनेकदा शाब्दिक बाचाबाची होत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर लागलीच धान्य वितरण करण्यात येईल.
महेंद्र पाटील,
अध्यक्ष, अलिबाग तालुका रास्त भाव दुकानदार
रेशनवर धान्यासाठी आतापर्यंत सात ते आठ वेळा आलो, परंतु मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे परत जावे लागले आहे. आधी टू जी होते, आता फोर जी आले, मात्र समस्या त्याच आहेत. यात सुधारणा होणे गरजेेचे आहे. रेशनवर धान्यसाठी सकाळी यायचे, रांगेत उभे राहायचे, आणि मशीन चालू नसल्याचे सांगताच परत माघारी फिरायचे. अजून हे किती दिवस चालणार?
संतोष नाईक,
लाभार्थी, चौल







