| सातारा | वृत्तसंस्था |
पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुली कोयना धरणाच्या जलाशयात बुडाल्या. त्यातील दोन मुलींना वाचवण्यात यश आले असून दोघींचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात रविवार दि.31 मार्च रोजी दुपारी मोठी दुर्घटना घडली. वाळणे गावातील 12 ते 13 वयोगटातील चार मुली दुपारी शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या. पोहत असताना चौघीही पाण्यात बुडाल्या. आजुबाजूच्या लोकांनी चौघींनाही जलाशयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. चारपैकी दोघींना वाचवण्यात यश आले. मात्र, दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय 12) आणि सोनाक्षी तानाजी कदम (वय 13) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर सृष्टी सुनील नलवडे (वय 13) आणि आर्या दीपक नलवडे (वय 12) या दोघींना तापोळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.