दुर्दैवी घटना! वायशेत येथील पाझर तलावात दोन मुलींचा बुडून मृत्यू

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर आदिवासी वाडीमधील दोन अल्पवयीन मुलींचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना सोमवारी (दि.5) दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी देखील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

रामधरणेश्वर हे अलिबाग जवळील बामणोली आणि वायशेत गावांच्या परिसरात वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे डोंगराळ भागात एक पाझर तलाव आहे. या तलावापासून काही अंतरावर आदीवासीवाडी आहे. या वाडीतील तीन लहान मुली दुपारी पाझर तलावाच्या परिसरात खेळत होत्या. दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या तलावात बुडाल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशिका नितीन पवार (8) आणि संजना संदीप पवार (3) असे या दोन मुलींची नावे आहेत. ही घटना सोमवारी दुपारनंतर घडली असून, त्यांचा मृतदेह सायंकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version