दोन महत्वाची संशोधनं!

कोरोनाचं भय कमी होवो ना होवो, सातत्यपूर्ण संशोधनांमुळे या व्याधीसंदर्भातली अनेक तथ्यं समोर येत आहेत. अर्थातच त्यातून हा संसर्ग मुळापासून समजून घ्यायची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यापासून किंवा त्याच्या परिणामांपासून बचाव करण्याबद्दल जागरुकता निर्माण होत आहे. कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांना कोरोनाचा त्रास दीर्घकाळ होणार किंवा नाही, हे रक्त तपासणीद्वारे शोधलं जाऊ शकतं. कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णांमध्ये कोविडची लक्षणं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दीर्घकाळ दिसतात. काही प्रकरणांमध्ये रुग्ण अनेक महिने अंथरुणावरुन उठू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने दीर्घकाळ टिकणार्‍या कोरोनाच्या रुग्णांवर संशोधन केलं आहे. संशोधनादरम्यान, संशोधन पथकाला आढळलं की संसर्ग झाल्यानंतर रक्तामध्ये विशेष प्रकारचे प्रथिनं रेणू तयार होतात. त्याला साइटोकिन्स म्हणतात. हे रेणू रुग्णाला कोरोनामुळे दीर्घकाळ त्रास होईल की नाही हे सांगतात. सायटोकिन्स रुग्णाच्या शरीरात अनेक महिने फिरत राहतात. केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी असंच आणखी एक सायटोकिन शोधलं आहे, ज्यामुळे कोरोना दीर्घकाळ टिकतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ही रक्त तपासणी अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत करता येते. कोरोनाचे दीर्घकालीन धोके सांगण्यासाठी ही सर्वात सोपी चाचणी आहे.

संशोधक डॉ. न्यारी सिथोल यांच्या मते, सध्या दीर्घकालीन कोरोना शोधण्यासाठी कोणतीही अचूक चाचणी किंवा पद्धत नाही. फक्त रक्तचाचणीतून सायटोकिन्स सारख्या बायोमार्करची पुष्टी झाली तर रुग्णांमध्ये दीर्घकाळ कोरोनाचा धोका असतो. ही रक्त चाचणी डॉक्टरांना दीर्घकाळच्या कोरोनाचं निदान करण्यात मदत करेल. संशोधकांच्या मते, संसर्गानंतर साइटोकिन्स शरीरात फिरत राहतात आणि रोगांशी लढणार्‍या रोगप्रतिकारक शक्तीला सांगतात की शरीरात अजूनही विषाणू आहे. रोगप्रतिकारक शक्ती अधिक त्वरीत कार्य करण्यास सुरवात करते. एकदा रोगप्रतिकारक शक्ती कार्यरत झाली की थांबण्याचं नाव घेत नाही. परिणामी, संसर्ग संपल्यानंतरही कोरोनाची काही लक्षणं दीर्घकाळ दिसून येतात. विषाणू शरीरातून गेल्यानंतरही काही लक्षणं दाखवत राहण्याला दीर्घकालीन कोरोना म्हणतात. अहवाल निगेटिव्ह असणार्‍यांना महिन्यांनंतरही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. दीर्घ कोविड म्हणजे कोरोनातून बरं झाल्यानंतरही बराच काळ लक्षणं टिकून राहणं. संशोधकांच्या मते, अनेक महिने झाल्यानंतरही रुग्णात कोरोनाची लक्षणं दिसत राहतात. यामध्ये थकल्यासारखं वाटणं, अतिसार, ओटीपोटात तणाव यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोरोना संसर्गानंतर पहिल्या आठवड्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं दिसल्यास रुग्णावर कोरोनाचा बराच काळ प्रभाव राहू शकतो. लंडनच्या किंग्ज कॉलेजच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. संशोधन म्हणतं की थकवा, डोकेदुखी, श्‍वास लागणं, स्नायू आणि शरीर दुखणं यासारखी लक्षणं संसर्गानंतर पहिल्या आठवड्यात दिसली तर दीर्घ कोविडचा धोका असतो. संसर्गाच्या चार ते आठ आठवड्यांनंतरही बरं न होणार्‍या कोरोना रुग्णांमध्ये कोरोनानंतरचा धोका वाढतो. पोस्ट कोविड म्हणजे दीर्घ काळापासून कोरोनाच्या दुष्परिणामांशी लढणं. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या 40 हजार रुग्णांवर संशोधन केलं. यामध्ये ब्रिटन आणि स्वीडनमधल्या रुग्णांचा समावेश होता. यापैकी 20 टक्के लोकांनी सांगितलं की संसर्ग झाल्यानंतर एक महिन्यानंतरही ते पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत. 190 रुग्णांमध्ये 8 ते 10 आठवडेकोरोनाची लक्षणं दिसून आली. त्याच वेळी, 100 रूग्णांनी सांगितलं की संसर्गानंतर ते 10 आठवडे अस्वस्थ होते. संशोधन म्हणतं की ही प्रकरणं कोविडचा प्रभाव बराच काळ सिद्ध करतात.

कोरोनामधून बरं झाल्यानंतर पुढील काही आठवडे हालचालींवर नियंत्रण न ठेवल्यास थकवा येतो आणि येणार्‍या काळात त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. 64 टक्के रुग्णांमध्ये अनेक महिन्यांपर्यंत परिणाम दिसतो. उपचारानंतरही रुग्णांना दम लागणं, थकवा, अस्वस्थता आणि नैराश्याने ग्रासलं आहे. हे संशोधन करणार्‍या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचं म्हणणं आहे की कोरोना संसर्गानंतर दोन ते तीन महिन्यांनी हा परिणाम दिसून येऊ लागला आहे. 64 टक्के रुग्णांना दम लागल्याने त्रास होत होता. त्याच वेळी 55 टक्के रुग्ण थकव्यामुळे त्रस्त होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. थकवा, श्‍वास घेण्यात अडचण, खोकला, सांधेदुखी, स्नायू दुखणं, श्रवण आणि दृष्टी समस्या आणि डोकेदुखी अशी दीर्घकाळच्या कोरोनाची लक्षणं आहेत. आतडं, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि हृदयाचं नुकसान होऊ शकतं. बरं झाल्यानंतर रुग्णांमध्ये उदासीनता, अस्वस्थतेची लक्षणं दिसतात.

आता आणखी एका संशोधनाचा वेध घेऊ या. गॅझेटचा वाढता वापर लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम करत असल्याबद्दल एक संशोधन पुढे आलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कोरोनाकाळात मुलं दिवसातून सुमारे आठ ते दहा तास गॅझेट्समध्ये घालवत आहेत. परिणामी, त्यांच्या मेंदूच्या पेशी खराब होत आहेत. लठ्ठपणा वाढत आहे. पुरेशी झोप मिळत नाही. त्यांचं वर्तन हिंसक होत आहे. मुंबईतल्या मरिना हॉस्पिलमधील न्यूरोसर्जन डॉ. राज अगरबत्तीवाला यांच्या मते पालक आपल्या मुलांना कोरोनामुळे घराबाहेर पडू देत नाहीत. ते मुलांना मोबाईल आणि टॅब्लेट खेळण्यासाठी देत आहेत. परिणामी, मुलं त्यावर तासनतास घालवत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने 47 पूर्वशालेय मुलांवर संशोधन केलं. ही मुलं दोन ते पाच वयोगटातली होती. त्यांनी अद्याप शाळेत जाणं सुरू केलं नव्हतं. ती गॅझेटवर जास्त वेळ घालवायची. त्यांचा मेंदू स्कॅन करण्यात आला. या मेंदूच्या ग्रे-मॅटरमध्ये नकारात्मक बदल झाल्याचं तपासणीतून समोर आलं. मेंदूमधला हा राखाडी पदार्थ मुलांच्या शिकण्याच्या कौशल्यांसाठी जबाबदार असतो.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने मुलांना दोन श्रेणींमध्ये विभागलं. पहिल्या गटातली मुलं दोन तास गॅझेट वापरतात. दुसर्‍या गटातली मुलं सात तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात. दोन्ही गटांमधल्या मुलांची भाषा चाचणी घेण्यात आली. दोन तास गॅझेट वापरणार्‍या मुलांनी सात तास गॅझेट वापरणार्‍या मुलांपेक्षा जास्त गुण मिळवल्याचं समोर दिसून आलं. दिवसातून अनेक तास एकाच जागी बसून गॅझेट वापरल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होत आहेत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. डॉ. अगरबत्तीवाला म्हणतात, हे बर्‍याच काळासाठी घडलं तर मुलांचं वजन बरंच वाढू शकतं. त्यांच्या शारीरिक हालचालींकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ चाईल्ड अँड अडोलेसेंट सायकियाट्रीच्या मते, टीव्ही शो, चित्रपट आणि व्हिडिओ गेम हे लक्ष्यापासून मुलांचं लक्ष विचलित करत आहेत. या मुलांच्या वागण्यात वाढती हिंसा आणि आक्रमकता आहे. मुलं त्यांच्या आकलनातून टिव्हीवरील हिंसक दृश्यांचा अर्थ घेतात आणि तशीच वागायला लागतात. जास्त प्रमाणात टीव्ही पाहण्यामुळे आणि झोपेच्या आधी गॅझेट वापरल्यामुळे मुलं पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. त्यांच्या मेंदूत चालणारं झोपेचं चक्र विस्कळीत होत आहे. परिणामी, ते निद्रानाशाशी झुंज देत आहेत. गॅझेट मुलांचं लक्ष विचलित करतात. अभ्यासाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी समजण्यास आणि लक्षात ठेवण्यात त्यांना अडचण येत आहे. गॅझेटचा वापर जसजसा वाढतो, तसतसं त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दिवसात दोन तासांपेक्षा जास्त काळ गॅझेट वापरल्याने मुलांच्या वागण्यात बदल होऊ शकतो. हा बदल त्यांच्या सामाजिक आणि भावनिक वर्तनात दिसून येतो. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते दोन ते पाच वयोगटातल्या मुलांना एका तासापेक्षा जास्त वेळ गॅझेट वापरू देऊ नये. शिवाय पश्‍चिम भारतातल्या 379 मुलांवर करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटलं आहे की या वयाची मुलं विशेषत: खेड्यांमध्ये गॅजेट्सवर एका तासापेक्षा जास्त वेळ घालवत आहेत. परिणामी, प्रत्येक वयोगटासाठी गॅझेट वापरण्याची मर्यादा निश्‍चित करण्याची गरज आहे.

Exit mobile version