| गोंदिया | प्रतिनिधी |
सडक अर्जुनी तालुक्यातील एका गावात वडिलांनेच आपल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. या घटनेची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा जिल्ह्यात मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. घाटबोरी/कोहळी येथील विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे, तर नवेगावबांध येथे शाळेतच विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणारा शिक्षक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी/कोहळी येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल करून मुख्याध्यापकाची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कामेद दामोदर कापगते (52) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. त्याने वर्गात शिकवताना द्विअर्थी शब्दांचा वापर करणे, विद्यार्थिनींना वाईट स्पर्श करणे इत्यादी गैरवर्तन निदर्शनास आल्याने विद्यार्थिनींनी घरी आपल्या पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष शामराव मस्के यांनी डुग्गीपार पोलिसांत 15 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
तसेच, दुसऱ्या घटनेत नवेगावबांध येथील एका शाळेतील शिक्षक सुरेश फागुजी बाळबुद्धे याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी 14 नोव्हेंबरला अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील शिक्षक फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. या शिक्षकाने शाळेत खेळाच्या सुट्टीत वर्गात एकटीच बसून अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार नवेगावबांध पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून, शिक्षक फरार असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे.







