दोघे जखमी
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर विशेषतः रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी भरधाव वाहनचालकांकडून स्टंटबाजी, अचानक लेन बदल, रेसिंग यासारखे प्रकार सर्रास घडत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशातच नेरूळ ते सानपाडा मोराज सिग्नल दरम्यान सोमवारी (दि.9) दुपारी एक भीषण अपघात घडला. एका ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगत असलेल्या डिव्हायडरला जोरात धडकली. कार पलटी झाल्यानंतर कारमध्ये असलेला चालक आणि ऑटो चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.







