। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. महाड तालुक्यातील नडगाव गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहन चालकाने स्कुटीला जोरदार धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.
राहुल वसंत पाटील (वय 29 वर्षे, रा. कलनाकवाडी, कसबा तरले, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, सध्या रा. बापट नगर बिरवाडी, ता. महाड) आणि अनुष्का जालिंदर मानकर (वय 25 वर्षे, रा. येडे मच्छिंद्र, ता. वळवा, जि. सांगली, सध्या रा. लक्ष्मी नगर, बिरवाडी, ता. महाड) अशी अपघातातील मृतांची नवे आहेत. हे दोघे त्यांचे ताब्यातील स्कुटीने मुंबईकडून गोवा बाजूकडे जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटकेत दोघे गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाल्याचे महाड एमआयडीसी पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. हे दोघे महाड तालुक्यातील बिरवाडी येथील रहात आहेत असे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अज्ञात वाहन चालक घटनास्थळी कोणतीही माहिती न देता फरार झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.





