| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मंडणगड तालुक्यातील शिरगाव परिसरात भीषण अपघात झाला. कार नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चरामध्ये जाऊन कोसळली. धुके आणि अंधारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढासळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.18) पहाटे चारच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हर्षदा जोशी (वय 70, रत्नागिरी) आणि शंकर करमरकर (वय 50, मुळगाव राजापूर, सध्या दापोली) यांचा समावेश आहे. तर प्रमोद मुकुंद लिमये (वय 35, केळशी) यांसह एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग आणि तांत्रिक बाबींचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत रत्नागिरी आणि राजापूरमधील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दोन्ही ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे.







