। जळगाव । वृत्तसंस्था ।
जळगाव जिल्ह्यात दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातामध्ये एका तरुणासह वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. रावेरमधील कोचूर-सावदा रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली असून या अपघातामध्ये कारचालक थोडक्यात बचावला असून, तो जखमी झाला आहे.
कोचूर ते सावदा रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की कार बाजूच्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातामध्ये चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे (वय 27) व अनिल चुडामण मेढे (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. मृत तरुण अविवाहित असून, आई-वडिलांना एकूलता एक होता. तर दुसरे मृत व्यक्ती हे सुतार काम करायचे. या अपघातात कारचालक एअर बॅगमुळे बचावला असून, किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेरच्या रुग्णालयात पाठवले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.