। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोन्ही अपघात न्हावाशेवा-पनवेल मार्गावर व टेंभोडे गावाजवळ घडले आहेत. यातील एकाचा मृत्यू दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकून, तर दुसऱ्याचा मृत्यू डम्परने दिलेल्या धडक दिल्याने झाला.
न्हावाशेवा-पुणे एनएच-4 बी मार्गावरील करंजाडे येथील ब्रिजवर शुक्रवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पहिला अपघात झाला. वसईतील जूचंद्र नायगाव येथे राहणारा गणेश चंद्रकांत खेताल (31) हा पहाटे वसई येथून मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने जात होता. त्याची दुचाकी न्हावाशेवा-पुणे एनएच-4बी मार्गावरील करंजाडे येथील ब्रिजवर आली असताना, भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकून हा अपघात झाला. या अपघातात गणेश गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.
दुसरा अपघात पनवेल तालुक्यातील टेंभोडे गाव येथील एकवीरा ढाब्याजवळ सकाळी 9.45 च्या सुमारास घडलेल्या दुसऱ्या अपघातात निखिल प्रकाश गोताळे (21) या तरुणाचा मृत्यू झाला. निखिल हा कॉलेजमधून सुटल्यानंतर त्याच्या दुचाकीने पालेखुर्द येथे घरी परतत असताना टेंभोडे गावाजवळ समोरून भरधाव डम्परने दुचाकीला धडक दिली. या अपघातात निखिल गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खांदेश्वर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेला डम्पर चालक गौतम शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





