। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळेल, असे आमिष दाखवून (34) वर्षीय महिलेची 20 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी नेहा मालवीया, समीर कामदार, जॉन हसमन, हर्षिता, अहान आणि अभिनव या सहा जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी (34) वर्षीय महिला अरिहंत अर्हम, कोप्रोली येथे राहत असून तिला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्यावर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबत माहिती दिली होती. तसचे त्यात कमी गुंतवणूकीमध्ये जास्त रक्कम मिळण्याबाबतची जाहिरात होती. त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले असता ग्रुप जॉईन केले. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक व आधारकार्डची तपासणी झाली. 22 फेब्रुवारी ते मे पर्यंत नेहा मालवीया, समीर कामदार, जॉन हसमन, हर्षिता, अहम आणि अभिनव यांनी संगनमताने बनावट कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर नफा मिळवण्याची जाहिरात केली आणि व्हाट्सअप ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करुन घेतले. तसेच ऑनलाइन अँड बँकिंग द्वारे 20 लाख 50 हजार रुपये घेऊन ऑनलाईन शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक केली.