इराणी चषकासाठी दोन मराठमोळे कर्णधार भिडणार

सामन्याला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात, संघ जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी |

बीसीसीआयने इराणी चषक 2024 साठी सध्याच्या रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबई आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’च्या संघांची घोषणा केली आहे. या संघांमध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांची बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली होती, मात्र, आता त्यांना टीम इंडियाच्या संघातून न वगळताा ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन मराठमोळे कर्णधार आमनेसामने येणार आहेत. ‘रेस्ट ऑफ इंडिया’चे कर्णधार ऋतुराज गायकवाड तर अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्त्व करणार आहे. हा सामना 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. नअलीकडेच सर्फराझ खानबद्दल अशी अटकळ बांधली जात होती की, त्याला टीम इंडियाच्या संघातून वगळून मुंबई संघात पाठवले जाऊ शकते. हे दावे पूर्णपणे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. सर्फराझशिवाय त्याचा भाऊ मुशीर खानही मुंबई संघात खेळणार आहे. ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. कारण ते दोघेही ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाकडून खेळणार आहेत. इराणी चषक 1960 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून ही स्पर्धा भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग बनली आहे. इराणी चषकमध्ये फक्त एकच सामना खेळला जातो, ज्यामध्ये गतविजेत्या रणजी चॅम्पियन्सचा सामना ‘रेस्ट ऑफ इंडिया’शी होतो. ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात गतविजेत्या रणजी चॅम्पियन्स संघातील खेळाडू वगळता इतर राज्यातील खेळाडू एकत्र येऊन खेळतात. मुंबई हा सध्याचा रणजी चॅम्पियन असल्याने त्याचा सामना ‘रेस्ट ऑफ इंडिया’शी होणार आहे.

मुंबई संघ : अजिंक्य रहाणे(कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, सर्फराझ खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस. 
रेस्ट ऑफ इंडियाचा संघ : ऋतुराज गायकवाड(कर्णधार), अभिमन्यू इसवरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्‍वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.
Exit mobile version