शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील जिते गावात विजेच्या धक्क्याने दोन दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला. दोन दुभत्या म्हशी दगावल्याने शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. जिते गावातील दूध उत्पादक शेतकरी शांताराम जाधव हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या गोठ्यातील म्हशी घेऊन चरण्यासाठी शेतावर जात होते. अकराच्या सुमारास त्यांच्या म्हशी घरी येण्यास निघाल्या असता जिते आदिवासी वाडीजवळ रस्त्याच्या कडेला महावितरणच्या खांबाला विजेची तार गुंडाळलेल्या अवस्थेत होती. या तारेतून वीजप्रवाह चालू होता. म्हशी चरत असताना या तारेचा स्पर्श होताच विजेचा जबर धक्का बसून दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला.
ही बाब लक्षात येताच शांताराम जाधव आपल्या म्हशीकडे पाहण्यासाठी गेले असता त्यांनादेखील त्या वीजवाहक तारेमधून वाहणाऱ्या विजेचा सौम्य धक्का बसला. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. मात्र, दोन दुभत्या म्हशी दगावल्याने त्यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे म्हशी दगावल्याचा आरोप शेतकरी शांताराम जाधव करत असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.