। खोपोली । वार्ताहर ।
खोपोली शहरात आठवडी बाजारात चोर्या करणार्या मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या. रेल्वे स्थानक रस्त्यावर एकाचा मोबाईल चोरीला गेला त्या नागरिकाने सदर तक्रार खोपोली पोलीस ठाण्यात दिली. संध्याकाळ पर्यंत तीन मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कदम, पो. नाईक बांगर, पो. शिपाई भालेराव, खरात, सोनावणे, तांबे यांनी टीम कामाला लागली. सध्या संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. आणि त्याचा फायदा आजच्या घटनेत पुरेपूर झाला. बाजारपेठेचे सर्व सीसीटीव्ही पासण्यात आले त्यात चोरीची घटना कैद झाली होती, त्यातील फुटेज च्या आधारे चोरांचे छायाचित्र काढण्यात आले व बाजारात फिल्डिंग लावण्यात आली आणि चोराचा शोध सुरू झाला आणि खोपोली पोलिसांना यश आलं. दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे तीनही चोरलेले मोबाईल मिळून आले आहेत. सदर दोन्ही चोर मूळचे मध्यप्रदेशातील असून ते सध्या पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टी मध्ये रहात आहेत.