पाईप चोरणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक

| पनवेल | वार्ताहर |

फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किंमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी अगोदरच गजाआड केले असतानाच यातील आणखी दोन आरोपींना कळंबोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील चिखले गावाच्या हद्दीत असलेल्या इक्रा स्टील अँड ट्यूब्स प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमधून जानेवारी 2023 ते आजपर्यंत अज्ञात आरोपींनी जवळपास 26 लाख 37 हजार रुपये किंमतीचे ग्रीन हाऊस व फॅब्रिकेशनसाठी वापरण्यात येणारे अठ्ठावीस टन वजनाचे जीआय व एमएस वेगवेगळ्या आकाराचे व लांबीचे पाईप चोरले होते. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर वपोनि अनिल पाटील व पोनि (गुन्हे) जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे यांनी तपासाची चक्रे फिरवली.

गोडाऊनचे सुपरवायजर जयकुमार तिवारी (47) याने त्याचे सहकारी मुकेश पटेल (22), लालाराम पटेल (23) यासह अन्य दोन आरोपी यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. यातील तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप टेम्पोसह चोरलेला माल असा मिळून 18 लाख 14 हजार 340 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत होते. सदर आरोपी मेगराज रुपाजी पटेल (31), केविलाल रुपाजी पटेल (33) दोघेही राहणार राजस्थान यांना कळंबोली परिसरात असलेल्या भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेण्यात आले. यांच्या अटकेमुळे चोरीस गेलेला अजून काही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Exit mobile version