मुक्त विद्यापीठ विज्ञानविद्या शाखेतर्फे दोन नवीन शिक्षणक्रम

एन्व्हायर्नमेंटल सायन्स, मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सला प्रवेश सुरु

| नाशिक | प्रतिनिधी |

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार नवीन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये बी.एस्सी (ऑनर्स) पर्यावरण विज्ञान (एन्व्हॉरॉन्मेंटल सायन्स) आणि एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (गणित-संगणक उपयोजन) या दोन शिक्षणक्रमांचा समावेश आहे.

विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेले हे शिक्षणक्रम यूजीसी-डीईबी मान्यताप्राप्त आहेत. ते केवळ सैद्धांतिक ज्ञानावरच नाही तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या तरतुदींवर आधारित आहे. बी.एस्सी. (ऑनर्स) (पर्यावरण विज्ञान) हा शिक्षणक्रम विद्यार्थ्याला हवामान विज्ञान, रिमोट सेन्सिंग आणि ईआयए (EIA) यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान देईल. तसेच मायनर, ओपन इलेक्टिव्ह, कम्युनिटी एंगेजमेंट, को-करिक्युलर आणि कौशल्य वाढवणाऱ्या विषयांची निवड करण्याची संधीही देईल.

पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी ईआयए विशेषज्ञ, संशोधक, सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट, पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्था (एनजीओ), शैक्षणिक संस्था, सीपीटीबी/एसपीबी यांसारख्या विविध सरकारी आणि खाजगी संस्थांमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. एम.एस्सी. (गणित-संगणक उपयोजन) या शिक्षणक्रमात क्रिप्टोग्राफी, एआय (AI), एमएल, डेटा सायन्स, प्रोग्रामिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक, संशोधन, डेटा ॲनालिसिस, कन्सल्टन्सी, फायनान्स यासारख्या विविध क्षेत्रात सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

संबंधित शिक्षणक्रमातील विद्यार्थ्यांना संशोधन तसेच फिल्ड प्रोजेक्ट आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंगचाही अनुभव घेता येईल. या शिक्षणक्रम नेट-सेट किंवा युपीएससी वा एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करण्यास उपयुक्त आहेत. त्यांचे दर्जेदार अध्ययन साहित्य ऑनलाईनदेखील उपलब्ध आहेत. या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विषयात बारावी, पदवी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://ycmou.digitaluniversity.ac भेट द्यावी किंवा विद्यापीठाच्या नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा व आपल्या उज्वल भविष्यासाठी ऑनलाईन प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांक 0253-2230580/2231715/2230106/2231714 किंवा 9307579874, 9307567182, 9207046750 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, विद्यार्थी सेवा विभाग संचालक डॉ. प्रकाश देशमुख व विद्यापीठ विज्ञान विद्याशाखा संचालिका प्रा. डॉ. चेतना कामळस्कर यांनी केले आहे.

Exit mobile version