पूररेषांमुळे चिपळूणचे दोन भाग

निषिद्ध क्षेत्र, नियंत्रित क्षेत्र
। चिपळूण । वृत्तसंस्था ।

शहर परिसरातील पूररेषा निश्‍चित करणार्‍या शासनाकडून निर्देशित केलेल्या लाल व निळ्या रेषेमुळे चिपळूण शहराचे दोन वर्ग झाले आहेत. एका वर्गात निषिद्ध क्षेत्र, तर दुसर्‍या वर्गाला नियंत्रित क्षेत्र संबोधले गेले आहे. निषिद्ध क्षेत्रामध्ये नदीच्या डाव्या व उजव्या तीरानजीकची निळी पूररेषा तर नियंत्रित क्षेत्रामध्ये दोन्ही तीरावरील निळ्या रेषेपासून त्याच ठिकाणी असलेली लाल रेषा यामधील क्षेत्राला नियंत्रित क्षेत्रात सामावण्यात आले आहे. या रेषांमुळे नव्या बांधकामांना अडचणी तर जुन्या बांधकामांच्या पुनर्बांधणीला अडचणी नसल्याचे सांगितले जाते. मात्र, या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रद्द करण्याची मागणी होत आहे.
याबाबत चिपळूण पालिकेने नागरिकांसाठी दिलेल्या जाहीर सूचनेनुसार शहरातील वाशिष्ठी व शिव नदीच्या तिरावर निळी व लाल रेषेचे मार्किंग केलेले नकाशे जलसंपदा विभागास प्राप्त झाले आहेत. निळी रेषेअंतर्गत सरासरीनुसार 25 वर्षांतून एकदा अथवा वारंवार येणारा पूर, त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र दर्शविण्यात आले आहे. लाल रेषेमध्ये सरासरीने शंभर वर्षातून एकदा पूर दर्शविण्यात आला आहे. निषिद्ध क्षेत्रातील कोणत्याही नव्या बांधकामांना परवानगी मिळणार नाही. मात्र, जुन्या अथवा पुनर्बांधणी बांधकामांना परवानगी दिली जाणार आहे. नियंत्रित क्षेत्रामध्ये लाल व निळ्या रेषा या भागांच्या दरम्यान नवीन बांधकाम करताना इमारतीचा तळमजला, जोत्याची पातळी लाल पूररेषा पातळीवर प्रस्तावित बांधकाम हे मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत.
सर्वसाधारणपणे निळी पूररेषा ही महामार्गाला समांतर आहे. लाल व निळी पूररेषा शहराच्या विकासाला मोठी अडचणीची ठरणार असून दोन्ही रेषांतर्गत नव्या बांधकामांना परवानगी मिळणार नाही. रेषांतर्गत नागरी वस्तीमधील पुनर्बांधणीकामांना परवानगी मिळणार आहे. याबाबत नागरिकांसह तज्ज्ञांसोबत पाहणी व चर्चा करून तसेच आवश्यक ते उपाय, नियोजन करून निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.

निळी पूररेषा
निळ्या पूररेषेमध्ये शहरातील गोवळकोट परिसरातील काही भाग, पेठमाप परिसरातील तांबटआळी, परीटआळी, गोवळकोट रोड, मुरादपूर, मुरादपूर मोहल्ला, वडार कॉलनी, शंकरवाडी, वाणीआळी, बापट आळी, बेंदरकरआळी, भोगाळे परिसर, बाजारपेठ, मार्कंडी व काविळतळी, पागमळा काही भाग, महालक्ष्मीनगर आदींचा समावेश आहे.

लाल रेषा
लाल रेषेबाहेरील क्षेत्रामध्ये राधाकृष्णनगर, ओऑसिस हॉटेलच्या मागील भाग, रावतळे, मतेवाडी, डीबीजे महाविद्यालय परिसर, इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते हॉटेल हायवे (ऑक्ट्रॉय नाक्याकडे जाताना महामार्गावरील डावीकडील भाग) हायवे हॉटेल ते एसएमएस हॉस्पिटलपर्यंत वरील बाजूस (पागझरीकडील)परिसर, पॉवर हाऊस, पाग, डॉमिनोजची वरील बाजू (पाग भागाकडे), देसाई बाजारचा वरील भाग (पाग भागाकडे), खेंड, गुहागर बायपास भागातील डोंगराळ भाग तसेच गोवळकोट किल्ल्याजवळील डोंगराळ भाग आदींचा समावेश आहे.

Exit mobile version