। नेरळ । प्रतिनिधी ।
चंद्रपूर येथे होणार्या अखिल भारतीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघासाठी रायगड जिल्ह्यातील दोन सुकन्या यांची निवड झाली आहे. मुलांच्या स्पर्धांमध्ये उतरून त्यांनी आपले करिअर घडविले असून त्यांची जिद्द आणि खेळातील कौशल्य यामुळे त्यांची माजी राणाजीपटू प्रवीण तांबे यांनी त्यांचा खेळ बघून निवड केल्याने रायगड जिल्ह्यात त्या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्ह्यात महिलांच्या गटात मुलींसाठी स्वतंत्र क्रिकेट स्पर्धा होत नसल्याने क्रिकेटमध्ये आपले करिअर घडविणार्या मुलींना सध्या होत असलेल्या 12,14,16 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेमध्ये खेळावे लागले. दोन्ही मुलींनी आपल्या शिस्तबद्ध खेळाने आपला दबदबा या प्रत्येक स्पर्धेवर उमटवला आहे. त्यांच्या पराक्रमामुळे दोन्ही खेळाडुंची मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक आणि माजी रणजीपटू प्रविण तांबे अॅकॅडमीने महिला संघात निवड झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील रोशनी पारधी या आदिवासी तरुणीचा समावेश राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. तिच्या बरोबर खोपोली येथील समृद्धी कांबळे या उगवत्या होतकरु खेळाडुंची निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या खेळाडू खेळणार आहेत. अशा या स्पर्धेमध्ये कु.रोशनी आणि कु.समृध्दी यांना महिला क्रिकेट विश्वात आपला ठसा ऊमटविण्याची संधी मिळणार आहे. रायगड आर.पि.एल.आयोजकातर्फे होतकरू खेळाडुंना योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे नियोजित पहिल्या महिला आर.पि.एल. स्पर्धेविषयी खेळाडुंच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
रोशनी ही अत्यंत गुणी अष्टपैलू खेळाडू असुन महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमी मध्ये आवेश चिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षे क्रिकेट चे धडे गिरवत आहे.तर कु.समृद्धी ही देखील हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू असून खोपोली मधिल शंकर दळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे क्रिकेट खेळत आहे. या दोन्ही खेळाडु आज पनवेल येथुन चंद्रपुर कडे रवाना झाल्या असून आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक आणि अन्य सहकारी खेळाडू यांच्यासोबत रवाना झाल्या आहेत.
