उरणमध्ये दोन सरपंचांसह 47 उमेदवारांचा विजय

बोकडविरा, चिर्लेत शेकापचा लाल बावटा फडकला

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील 17 ग्रामंपंचायतींचा मंगळवारी (दि.20) निकाल जाहीर झाला असून थेट सरपंचपदी शेकापच्या दोन उमेदवारांचा विजय झाला असून सदस्यपदी 45 उमेदवारांना मतदारांनी कौल दिला. चिर्ले ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात असलेले शेकाप-ठाकरे गटाचे सुधाकर उर्फ काका भाऊ पाटील यांनी 1321 मते घेत काँग्रेस-भाजपा आघाडीच्या विनोद पाटील यांचा दारुण पराभव केला. तसेच बोकडविरामध्ये शेकापच्या अर्पणा मनोज पाटील यांना 829 मते मिळाली तर आघाडीचे उमेदवार रोहन महादेव भोईर यांना 400 मतांवर समाधान मानावे लागले. भरघोस मतांनी विजय मिळविल्यामुळे चिर्ले तसेच बोकडविरामधील शेकाप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

या निवडणूकीत उरण तालुक्यातून शेकापचे एकूण 67 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यापैकी सरपंचपदासह सदस्यपदाच्या 47 उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये बोडकविरामध्ये सरपंचासह 5 सदस्य, चिर्लेमध्ये सरपंचासह 4 सदस्य, पागोटे 7, पिरकोन 6, वशेणी 5, नवघर 3, सारडे 4, कळंबुसरे 3, भेंडखळ 3, नवीन शेवा 2, धुतूम 1, डोंगरी व पाणजेमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 47 उमेदवारांना मतदारांनी कौल दिला.

रानसई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गटांमध्ये चुरशीची लढत झाली. त्यामध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार राधा पारधी विजयी झाल्या. जसखार ग्रामपंचायतीच्या शिवसेना ठाकरे गट-भाजप आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार काशिबाई हसुराम ठाकूर यांनी पक्ष विरहित युवा गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुळा ठाकूर यांना पराभूत केले.

नवीन शेवा ग्रामपंचायतमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनल निलेश घरत यांनी 880 मते घेत भाजप आघाडीच्या उमेदवार चेतना घरत यांना पराभूत केले. पाणजे ग्रामपंचायत निवडणूकीत अपक्ष उमेदवार लखपती हसुराम पाटील यांना 429 मते मिळाली तर ठाकरे गट-भाजप उमेदवार रोहन महादेव भोईर यांना 400 मतांवरच समाधान मानावे लागले.

पागोटे ग्रामपंचायतमध्ये शिवसेना ठाकरे गट व शेकाप सरपंच पदाचे उमेदवार कुणाल पाटील यांनी 695 मते घेत विजय संपादन केला. कळंबुसर ग्रामपंचायतमध्ये शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार उर्मिला निनाद नाईक यांना 938 मते मिळाली तर भाजप सरपंच पदाच्या उमेदवार सरिता रत्नदीप नाईक यांना 530 मते मिळाली.

नवघर ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गट-शेकाप युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सविता नितीन मढवी यांनी 1025 मते घेत भाजपच्या उमेदवार शालिनी गणेश वाजेकर यांना पराभूत केले. भेंडखळ ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजिता पाटील यांचा विजय झाला.

करळ ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार अनिता अरविंद तांडेल यांनी 11 मतांनी विजय मिळविला. डोंगरी ग्रामपंचायतमध्ये भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संकेत दिलीप घरत, सारडेमध्ये भाजपचे रोशन पांडुरंग पाटील विजयी झाले.

पुनाडे ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस आघाडीचे निलेश कातकरी यांनी भाजपच्या सत्यवान कातकरी यांचा पराभव केला. पिरकोनमध्ये काँग्रेस-भाजप आघाडीच्या कलावंती पाटील, धुतूममध्ये काँग्रेस-शिंदे गटाच्या सुचिता ठाकूर विजयी झाल्या.

पाणजे व चिर्ले ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी दोघा उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने चिठ्ठी काढून उमेदवार विजयी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते.

Exit mobile version