। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांत दोन भीषण अपघात घडले असून, यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना खालापूर तालुक्यातील चौक-कर्जत मार्गावर घडली. भरधाव टेम्पोने दोन दुचाकींना धडक देऊन अपघात घडला. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मृताचे नाव संजय भस्मा असे आहे. तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला होता. मात्र, चौक पोलिसांनी पथक तयार करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तर दुसरी घटना कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथे घडली. रेती भरून निघालेला ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळल्याने चालक संकेत बारसी (28), रा. हुमगाव याचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दोन्ही अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






