| पोलादपूर | वार्ताहर |
महाड तालुक्यातील कांबळे येथील दोन मुलींचे अपहरण झाल्याची घटना शनिवारी (दि. 22) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्या दोन मुलींना एका व्यक्तीने राहत्या घरातून फुसलावून पळून नेल्याची तक्रार मुलींच्या आई-वडिलांनी महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींची नावे अमृता अनिल गायकर (17) व नम्रता अनिल गायकर (16) असे असून, त्या मुळच्या राहणार कात्रज जांभूळवाडी रोड हनुमान नगर येथील आहेत. मुलींना पळवून नेणाऱ्या एका व्यक्ती विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुर्वे करीत आहेत.