। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. चाचिवली गावाजवळ दोन महामंडळाच्या बस समोरासमोर धडकल्या असून, या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे–कोलाड महामार्गावरील हा रस्ता वळणदार आणि घाटातील असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक मानला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन–बीड ही एसटी बस कोकणातून पुण्याकडे येत होती, तर चिंचवड–खेड ही एसटी पुण्याहून कोकणाकडे जात होती. ताम्हिणी घाटाजवळील एका तीव्र वळणावर श्रीवर्धन–बीड बसच्या चालकाचा अचानक गाडीवरचा ताबा सुटला. ब्रेक नीट लागला नाही आणि बस डोंगराच्या कडेला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याच क्षणी समोरून चिंचवड–खेड एसटी बस येत होती आणि दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली.
अपघातानंतर तात्काळ स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि महामार्गावरील इतर वाहनचालक मदतीला धावून आले. त्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून तातडीने पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार सुरू आहेत आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गणेशोत्सव काळात पुणे–कोकण मार्गावरील ताम्हिणी घाट, मुंबई–गोवा महामार्ग अशा अनेक मार्गांवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी वळणदार रस्ते, मुसळधार पावसामुळे ओले व घसरडे डांबरीकरण आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. अशा वेळी चालकांनी सावधगिरी बाळगणे आणि प्रवाशांनीही दक्ष राहणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.





