महाड तालुक्यातील दोन हजार रुग्णांना दृष्टी

| महाड | वार्ताहर |

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून महाड तालुक्यातील जवळपास 2000 रुग्णांना दृष्टी मिळाली आहे. पनवेलमधील आर. झुनझुनवाला शंकरा नेत्र रुग्णालय आणि आधार सामाजिक सेवा संस्था व शेतकरी कामगार सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात आतापर्यंत 45 शिबिरे घेण्यात आली आहेत.

महाड तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ व दुर्गम असल्याने अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडतात. सध्या शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिक वेगवेगळ्या नेत्रविकारांनी त्रस्त आहेत. तर काहींना मोतीबिंदू झाल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने अशा रुग्णांच्या उपचारासाठी सामाजिक संस्था व आर झुनझुनवाला शंकरा नेत्र रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. महाडमधील माजी नगरसेवक सुनील अगरवाल, आधार सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप शिलीमकर यांच्यासह डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. सुजाता दाभाडकर तसेच शेतकरी कामगार सेवाभावी संस्थेकडून यासाठी मदत मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या शिबिरात 61 रुग्णांमध्ये मोतीबिंदूची समस्या आढळली. त्यापैकी 59 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. महाड, पोलादपूर, माणगाव, खेड, रत्नागिरी, भोर व इतर ठिकाणी हजारो रुग्णांची आतापर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

Exit mobile version