काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाची झडप
। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी अकोल्यामधून सहल आली होती. यामध्ये तीन शिक्षक, 12 विद्यार्थी यांचा समावेश होता. शनिवारी (दि.८) सायंकाळी यातील काही मुले काशीद येथील समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते. खोल समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीन विद्यार्थी पाण्यात वाहून गेले. या तीन विद्यार्थ्यांपैकी आयुष रामटेके व राम खुटे यांचा मृत्यू झाला. तर आयुष बोबडे याला वाचवण्यात यश मिळाले आहे. आयुषवर सरकारी इस्पितळात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सहलीच्या सुरुवातीच्या हंगामात अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बाबतचा अधिक तपास मुरुड पोलीस करीत आहेत.





