पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी; टेम्पोचालक फरार
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर टेम्पो आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरून प्रवास करणारे दांपत्य गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. एकनाथ बबन शेंडे असे मृत व्यक्तीचे नाव असून पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेरळ जवळील बेकरे असलपाडा गावातील एकनाथ बबन शेंडे (52) आणि पत्नी जयश्री एकनाथ शेंडे हे दाम्पत्य बाजार खरेदीसाठी म्हणून आपल्या गावातून नेरळ येथे दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी कर्जतकडून कल्याण दिशेने भरधाव येणाऱ्या आयसर टेम्पोच्या चाकाखाली दुचाकी येऊन हा अपघात घडला. हा अपघात टोकरे आंबिवली परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. तर अपघातानंतर नागरिकांच्या भीतीनेच टेम्पोचालक आपले वाहन सोडून घटनास्थळाहून फरार झाला.
या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, एकनाथ बबन शेंडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून फरार टेम्पोचालकाचा शोध घेत आहेत.






