दुचाकी चोराला नेरळ पोलिसांनी घेतले ताब्यात

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ रेल्वे स्थानकात राहणाऱ्या तरुणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली होती. त्या दुचाकी चोरीबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरळ पोलिसांनी तपास करून त्या दुचाकी चोरट्याला चोरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

नेरळ रेल्वे स्थानक परिसरात राहणारे रवींद्र वसंत पादीर यांची घरासमोर उभी करून ठेवलली दुचाकी चोरीला गेली होती. रवींद्र वसंत पादीर यांनी आपली दुचाकी दिवाणपार्क सोसायटी येथे आपल्या बिल्डिंगच्या खाली पार्क केलेली होती. दुसर्‍या दिवशी ते कामावरून घरी परत आले असता त्यांना गाडी दिसली नाही. त्यामुळे आजूबाजूला परिसरात विचारणा केल्यावर गाडी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश भिवा मोरे हे करीत होते. सुरेश मोरे यांनी या प्रकरणाबाबत तांत्रिक तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कर्जत तालुक्यातील सराईवाडी येथील भूपेश धावू सराई हे नाव समोर आले. तात्काळ त्यांनी भूपेशचा शोध घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी गुन्हा कबुल करत त्याने दुचाकीदेखील पोलिसांच्या स्वाधीन केली. गुन्हा घडला त्याच्या 48 तासांच्या आत नेरळ पोलिसांनी तपास पूर्ण केल्याने फिर्यादी यांना दुचाकी परत मिळली आहे. चोरीला गेलेली दुचाकी ही परत मिळाल्याने फिर्यादी रवींद्र वसंत पादीर यांच्या स्वाधीन केली आहे. या कामगिरीबद्दल नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version