। पनवेल । वार्ताहर ।
स्कुटी गाडी चोरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास पनवेल वाहतूक शाखेच्या पथकाने विशेष नाका बंदी दरम्यान पकडल्याने त्यांच्या कडून अनेक चोरीच्या गाड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कल या ठिकाणी पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पंधरे, पोलीस हवालदार कौले, साबळे, महिला पोलीस हवालदार भाटकर, पवार या पथकासोबत विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. सदर नाकाबंदी दरम्यान स्कुटीवरील चालक विना हेल्मेट मिळून आल्याने सदर चालकास वाहन बाजूला घेण्यास सांगितले असता सदर स्कुटी चालक हिसका देऊन पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन वाहनाच्या कागदपत्र बाबत विचारपूस केली त्यावेळी स्कुटी चालक संशयितरित्या उत्तर देत असल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरचे वाहन हे चोरी करून पळून जात असल्याची कबूल दिली. त्याप्रमाणे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात सदर स्कुटी व चालक यास पुढील योग्य त्या कारवाई करीता ताब्यात देण्यात आले आहे.
दुचाकी चोरट्यास वाहतूक शाखेने केले जेरबंद
