| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून रपेट मारण्याचा व्यवसाय करणार्या अश्वपालकाने आपली दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली होती. सकाळी पार्क केलेली दुचाकी सायंकाळी घरी जाण्यासाठी घ्यायला गेल्यावर तिची चोरी झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान, याबाबत माथेरान पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहून याप्रकरणी चार तरुणांना अटक केली आहे.
अश्वपालक रामचंद्र नामदेव ठमके हे 35 वर्षीय तरुण धोत्रे गावातून माथेरान येथून व्यवसाय करण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे 11 नोव्हेंबर रोजी ठमके यांनी सकाळी दहा वाजता आपली एमएच 46 आर 0248 ही होंडा शाईन कंपनीची दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली आणि व्यवसाय करण्यासाठी निघून गेले. त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता अश्वचालक रामचंद्र ठमके हे आपली कामे उरकून घरी जाण्यासाठी पार्किंग येथे दुचाकी घेण्यासाठी आले असता, त्यांची दुचाकी तेथे आढळून आली नाही. याबाबत ठमके यांनी पोलिसात तक्रार केली.
माथेरान पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कारभार असल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.एम. पाटील आणि पोलीस शिपाई दामोदर खतेले यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी माथेरान दस्तुरी नाका येथील पार्किंगमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासले असता रामचंद्र ठमके यांची दुचाकी चोरुन नेताना काही तरुण दिसले. त्यावर पोलिसांनी माथेरानमधील तीन आणि एक बाहेरील अशा चार तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आपणच दुचाकी चोरली असल्याचे कबूल केले. चार तरुणांना माथेरान पोलिसांनी अटक केली. या चारपैकी तीनजण माथेरानमधील असून, एक पुणे येथील आहे. यातील दोघे अल्पवयीन आहेत.