रोह्यात विनानंबर प्लेटच्या दुचाकींचा सर्रास वावर

Oplus_131072

वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

| धाटाव | वार्ताहर |

सबंध रोहा तालुक्यात आणि शहरातही नंबर प्लेट नसणार्‍या दुचाकी वाहनांचा चांगलाच सुळसुळाट वाढला आहे. ग्रामीण भागासह शहर परिसरात नंबर प्लेट नसणार्‍या दुचाकी वाहनांबद्दल संशय व्यक्त केला जात असताना रोह्यात वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट नसणार्‍या वाहनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का? याबद्दल संशय व्यक्त होताना दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी तर रस्त्यावर दुचाकी वाहनांना नंबर प्लेट नसताना दुचाकींचा सर्रास वापर कशासाठी केला जातो? याचीही सध्या चर्चा रंगू लागली आहे. तर राजरोसपणे ही वाहनं फिरत असल्याने वाहन कायद्याला दुचाकीस्वारांनी मात्र तिलांजली दिली असल्याचेही समोर आले आहे. मात्र, वाहतूक पोलीस प्रशासन या गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील का, असा प्रश्‍न आता नागरिकांना पडला आहे.

रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देत असतात, परंतु अलीकडे जिल्ह्यात विनानंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विनानंबरची अनेक जुनी वाहनेही रस्त्यावरून धावताना दिसत आहे. वाहनचालकांचा वेग एवढा अमर्यादित असतो, त्यातही भरीस भर म्हणजे रस्त्यावरून धावणार्‍या अनेक वाहनांवर नंबर प्लेटच दिसून येत नाही, तर अनेक वाहने त्रोटक नंबरची तर काही वाहनांच्या नंबर प्लेट अर्धवट आकड्यांमध्ये पहावयास मिळतात. अशा विनानंबरच्या वाहनांकडून काही अप्रिय घटना घडल्यास ते वाहन कसे लक्षात ठेवायचे, अशी परिस्थिती सध्या तरी आहे.

नागरिकांकडून कारवाईची मागणी
काहीच कामे नसताना केवळ शाळा, कॉलेजजवळ घिरट्या घालणार्‍या दुचाकीस्वारांची संख्या सध्या वाढली आहे. पण हल्ली दुचाकी वाहनांचे नंबर गायब झाल्याचे व त्याजागी ‘अण्णा’, ‘दादा’, ‘हिंदू’, ‘बेडर’ अशी नावे लिहिलेल्या नंबर प्लेट लावलेल्या दिसतात.अनेक दुचाकी नंबरविनाच वापरण्यात येत आहेत. तरुण व अल्पवयीन मुले या दुचाकी वाहनांचा सर्रासपणे वापर करत आहेत. यामुळे एखादा अपघात झाल्यास नंबर नसल्याने त्याची चौकशी करणे पोलीस खात्यास जिकिरीचे ठरू शकते. अशा बिगर नंबर प्लेटच्या दुचाकी वाहनांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करून शिस्त लावण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
Exit mobile version