| माणगाव | प्रतिनिधी |
बांधकामाकरिता वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी अहवालासाठी 15 हजारांची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन महिलांना सोमवारी (दि.8) रंगेहाथ पकडले. माणगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस नंदकुमार म्हात्रे यांची स्वतःच्या नावाची शासन नोंदणीकृत संस्था असून, यातील तक्रारदार यांच्या परिचयाचे आहेत. तक्रारदार हे सुद्धा उप ठेकेदार म्हणून काम करतात. महाराष्ट्र शासनाचे पतन अभियंता, पतन अभियांत्रिकी विभाग कोकण भवन नवी मुंबई यांच्यामार्फत अलिबाग तालुक्यातील धाकटा शहापूर या ठिकाणी खाडीलगत रॅम्प बांधण्याचे श्रेयस म्हात्रे यांना एप्रिल 2025 मध्ये कंत्राट देण्यात आले होते. कायदेशीर प्रक्रिया, इतर कामकाजाचे अधिकार पत्र त्यांना दिले गेले होते. त्यानुसार तक्रारदारांनी काम चालू केले होते, पण कामाकरिता वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी करून तसा अहवाल सहाय्यक संशोधन अधिकारी दक्षता व गुण नियंत्रण जिल्हा प्रयोगशाळेकडून हवा होता. त्याकरिता तक्रारदारांनी 18 हजारांचे शासकीय शुल्कदेखील भरले होते, पण अहवालासंदर्भात चौकशी केली असता कार्यालयातील सोनल नाडकर या महिलेने अहवाल देण्याकरिता शासकीय शुल्कव्यतिरिक्त 18 हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोनल नाडकर (28), रा. निजामपूर, ता. माणगाव, संजना धाडवे (29) रा. राधाश्याम अपार्टमेंट, माणगाव यांना रंगेहाथ पकडले आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि रायगड सरिता भोसले, पो. नि. नारायण सरोदे, पो. नि. निशांत धनवडे, सहा फौज. विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ, पो. ह. महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, पो. शि. कोलमकर, म. पो. शि. मोनिका मोरे, मोनाली पाटील, चालक सागर पाटील यांनी केली.






