| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर वसाहत परिसरात दोन महिलांच्या दागिन्यांची लूट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खारघर, सेक्टर-32 मधील ओवे कॅम्पमध्ये राहणाऱ्या वंदना साळुंखे (46) या सेक्टर-35 मधील हाईड पार्क सोसायटीच्या पाठीमागील रस्त्याने पायी चालत आपल्या कामावर जात होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारूंनी वंदना साळुंखे यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची 75 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले. या घटनेनंतर वंदना साळुंखे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर दुसऱ्या घटनेत खारघर, सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या मिना गायकवाड (57) या शिलाई मशीनची मोटार दुरुस्ती करण्यासाठी नवरंग चौकात गेल्या होत्या. त्यानंतर त्या पायी चालत घरी परतत होत्या. याचवेळी त्यांच्या समोरुन मोटारसायकलवरुन आलेल्या एका लुटारुने मिना गायकवाड यांच्या गळ्यातील 72 हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ खेचून पलायन केले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







