खारघर टेकडीवर दोन तरुण भरकटले

। पनवेल । वार्ताहर ।
खारघर टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि अंधारात वाट विसरलेल्या दोन तरुणांचा खारघर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री दोन वाजता शोध घेतला. तसेच सुखरुप असल्याची खात्री पटल्यानंतर सोडून दिले.

मानखुर्द येथील अभिषेक रामदास यादव (वय 22) आणि शंकर सुर्यनारायण गवळी (वय- 22) दोघे जण खारघर टेकडीवर ट्रेकिंगसाठी आले होते. काही वेळेनंतर ते टेकडीवरुन खाली उतरत असताना, पावसामुळे डोंगरावर मोठया प्रमाणात धुके पडल्यामुळे तसेच अंधार आणि झाडांमुळे त्यांना रस्ता शोधूनही सापडत नव्हता. त्यामुळे या तरुणांनी पोलीस कंट्रोलला संपर्क साधून घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. सदर माहिती प्राप्त होताच खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरज कांबळे आणि पांडुरंग घागरे यांनी खारघर अग्निशमन केंद्रातील जवानांसोबत खारघर डोंगर गाठून तरुणांचा शोध सुरु केला.मात्र, त्यांना या दोन तरुणांचा संपर्क झाला नाही. सीबीडी खारघर पासून शीळफाटा पर्यंत जवळपास दहा ते बारा किलोमीटर अंतर लांब डोंगराची रांग पसरल्यामुळे स्थानिक आणि माहिती असलेल्या व्यक्तीची मदत शोध घेण्याचे ठरवून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील तसेच आदिवासी पाड्यातील सागर पारधी, प्रकाश पारधी, समाधान नाईक आणि अरविंद ठाकूर यांना मदतीला घेतले आणि पुन्हा सदर दोन तरुणांचे शोध कार्य सुरु केले. त्यावेळी रात्री एकच्या सुमारास शीळफाटा डोंगर झाडीत सदर दोघेजण मिळून आले. तेथून या दोन तरुणांना घेवून पोलीसपथकाने रात्री दोन वाजता खारघर पोलीस ठाणे गाठले. यानंतर सदर तरुणाच्या कुटुंबियांना संपर्क करुन पोलिसांनी ते सुखरुप असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांना सोडून दिले.

डोंगरावर पडणार्‍या रिमझिम पावसामुळे पोलीस, अग्निशमन जवान आणि ग्रामस्थ भिजून गेले होते. या दोन तरुणंचा शोध घेऊन त्यांना रात्री दोनच्या सुमारास खारघर पोलीस ठाण्यात आणून, दोघांची नोंद करुन सोडून देण्यात आले.

संदीपान शिंदे, रिष्ठ पोलीस निरीक्षक
Exit mobile version