यु-मुम्बा कबड्डी संघाचा अजिंक्य कापरे “स्वदेस ड्रीम व्हिलेज”ला देणार सदिच्छा भेट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात स्वदेस फाऊंडेशनमार्फत 75 ड्रीम व्हिलेज निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून हे काम प्रगतीपथावर आहे. या गावामधील गाव विकास समिती व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी यु-मुम्बा कबड्डी संघाचा माजी खेळाडू अजिंक्य कापरे शनिवार, दि.11 जून 2022 रोजी महाड तालुक्यातील गोंडाळे ग्रामपंचायतीमधील झांजे कोंड, किंजलोळी बुद्रुकमधील पार्टे कोंड तसेच माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले या गावांना सदिच्छा भेट देणार आहेत.

या भेटीत अजिंक्य कापरे हे ड्रीम व्हिलेज मध्ये गाव विकास समिती, शासन व स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामांना भेट देवून काजू प्रक्रिया केंद्रांमधील बचतगटातील महिलांसोबत चर्चा साधणार तसेच लोणेरे येथे युवकांबरोबर संवाद साधणार आहेत.

स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला व झरिना स्क्रूवाला यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील 75 गावे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदर्श व शाश्वत बनत आहेत. तरी या कार्यक्रमास इतर गावातील नागरिकांनी ड्रीम व्हिलेजची संकल्पना कशा पद्धतीने पूर्णत्वास येत आहे हे अनुभविण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले आहे.

Exit mobile version