। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुढील वर्षी टी-20 आशिया कप 2025 स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती संघाने पात्रता मिळवली आहे. त्यामुळे पुढीलवर्षी होणार्या आशिया कप स्पर्धेत युएईचा संघही खेळताना दिसणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी एकच जागा रिकामी होती, ज्यासाठी ओमानमध्ये एसीसी प्रीमियर कप ही स्पर्धा नुकतीच खेळवण्यात आली. एकूण 10 संघात झालेल्या या स्पर्धेत युएईने रविवारी (दि.21) झालेल्या अंतिम सामन्यात ओमानला 55 धावांनी पराभूत केले. त्यामुळे युएईने आशिया कप 2025 साठी हक्क सांगितला आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानही खेळणार आहेत.
युएईकडून कर्णधार मुहम्मद वसीमने शानदार शतक केले. त्याने 56 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी करताना अलिशन शराफुसह 93 धावांची सलामी भागीदारी केली. शराफु 34 धावांवर बाद झाल्यानंतर दुसर्या विकेटसाठी विष्णू सुकुमारनबरोबर दुसर्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. सुकुमारन 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर शतक करून वसीमनेही विकेट गमावली. पण अखेरीस असीफ खानने 16 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी करत संघाला 200 पार नेले. ओमानकडून बिलाल खानने 2 विकेट्स घेतल्या,तर शकिल अहमद आणि कर्णधार झिशन मकसूद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यानंतर 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानला 20 षटकात 9 बाद 149 धावाच करता आल्या. ओमानची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 11 धावांतच 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर प्रतिक अठवले (49), खालीद कैल (30) आणि फयाझ बट (23) यांनी छोटेखानी खेळी करत संघाला 140 धावांचा टप्पा पार करून दिला. परंतु, कोणालाही मोठी खेळी करून संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. प्रतिकचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. युएईकडून जुनैद सिद्दकीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर मुहम्मद फारुक आणि आयान अफझल खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच बासिल हमीदने 1 विकेट घेतली.