380 विद्यार्थ्यांनी सहभाग
| उरण | प्रतिनिधी |
उरणचे कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय तसेच यूईएस महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई विद्यापीठाच्यावतीने उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव सरस्वती मंडपाच्या आवारात जल्लोषात संपन्न झाला.
मुंबई विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा उडान महोत्सव तरुणाईचे आकर्षण ठरला. या महोत्सवात नवी मुंबई व उत्तर रायगड जिल्ह्यातील एकूण 21 महाविद्यालयाच्या एकूण 380 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हा महोत्सव विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक प्रा. डॉ. बळीराम व एन.गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या महोत्सवातील उद्घाटनीय कार्यक्रम युईएसचे चेअरमन चंद्रकांत ठक्कर, कोकण ज्ञानपीठ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चंद्र सिंगारपुरे, मिलिंद पाडगावकर, डॉ. कुणाल जाधव, प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, प्रा. मीनाक्षी गुप्ता, फील्ड कॉर्डिनेटर डॉ. देविदास बामणे, प्रा. व्हि.एस. इंदुलकर, प्रा. डॉ. ए.आर. चव्हाण व डॉ. पी.आर. कारुळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उडान महोत्सव आयोजित केला जातो, असे प्रतिपादन केले.
या महोत्सवात वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, पथनाट्य, पोवाडा व क्रियेषण लेखन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. या स्पर्धेचे परीक्षण सुनंदा मनोज कुमार, विजयकुमार कालवले, संजय शेटे, संजीव पाटील, अशोक शिर्के, भीमराव खेत्रे, प्रा. सुशील ससाने आदी आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार व पूर्ण क्षमतेने आपली कला सादर केली व प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे हा उडान महोत्सव तरुणायचे आकर्षण ठरला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाच्यावतीने पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान, युईएस संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी युईएसचे माजी चेअरमन तनसूक जैन हे देखील उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. हन्नत शेख यांनी केले. तर, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या अजिवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे प्रमुख सहयोगी प्रा.व्हि. एस.इंदुलकर यांनी आयोजक या नात्याने उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात दोन्ही महाविद्यालयाच्या एकूण 40 शिक्षकांनी व 60 स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा प्रो. कुलगुरू व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व वेळोवेळी असे उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उडान महोत्सवाच्या आयोजनामुळे उरणकरांनी सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेतला.
