| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने, डी. एस. कुळकर्णी फाऊंडेशन इंदापूर आणि ट्रॅक अँड बियॉन्ड मुंबई पुरस्कृत, कांश स्पार्टींग हब मुंबई आयोजित तालुकास्तरीय ‘उडान क्रीडा महोत्सव’ शनिवारी (दि.14) माणगाव तालुका क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडला.
या स्पर्धेमध्ये माणगाव, तळा व महाड तालुक्यांतील शाळा, स्पोर्ट्स क्लबमधून 325 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. 8 ते 17 अशा वेगवेगळ्या वयोगटातील मुला-मुलींनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन क्रीडाशैलीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. डी. एस. कुळकर्णी फाऊंडेशन, इंदापूरचे अमोल कुळकर्णी, ट्रॅक अँड बियॉन्ड मुंबईचे निलेश जाधव, कांश स्पोर्टींग हब मुंबईचे नितीन सावंत, स्वप्नील देसाई, अमित पाताडे, शाळांमधील क्रीडा शिक्षक आणि एस.एस. निकम इंग्लिश स्कूल व इंदापूरमधील शिक्षकांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन केले. या क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, तालुका क्रीडा मार्गदर्शक संजय गमरे या सर्वांचे क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी माणगाव तालुक्यातील अनेक क्रीडाप्रेमी व मार्गदर्शक यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला.
माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात
