ठाकरेंची महायुतीवर घणाघाती टिका
। मुंबई । प्रतिनिधी ।
संभाजी महाराज ज्याप्रमाणे औरंगजेबापुढे झुकले नव्हते. तसेच, आम्ही हि झुकणार नाहीत. देशाचा पंतप्रधान हा कुठल्याच पक्षाचा नसतो, परंतु आज मोदी भाजपचा प्रचार करत आहेत. त्या पदाची पंतप्रधानांनी गनिमा राखायला हवी. राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात कि, राज्यात डबल, टिबल इंजिन आणि अनेक डबे जोडले जात आहेत. परंतु, आता कितीही इंजिनाचे डबे लावा यावेळी तुमचे दिल्लीचे इंजिन इंडिया आघाडी बदलून टाकणार आहे. अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईमध्ये केली. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा मंगळवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर येथील मैदानात आयोजित करण्यात आली होती.
वसई महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजप गोमूत्रधारी तसेच बुरसटलेल्या मानसिकतेचा पक्ष असून मला नकली शिवसेना म्हणणारे भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली नेते आहेत, अशा शब्दात त्यांचा खरपूस समाचार घेतला. आपल्या पाऊण तासांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ला केला. पंतप्रधान हा कुठल्या पक्षाचा नसतो मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून भाजपाचा प्रचार करत आहेत. तो प्रचार करणे त्यांनी थांबावावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, तुम्ही कितीही इंजिनाचे डबे लावा. पण हे इंजिन लावतात अन् धापा टाकतात. तुमचे दिल्लीचे इंजिनच बदलून टाकू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपाने देशात कंत्राटी पद्धती आणली आहे. देशात कोणाला कायम स्वरूपी रोजगार नाही, कंत्राटी पद्धतीने अग्निववीर आणि कामगार पद्धती आणली आहे. त्यामुळे तुमचे कंत्राट येत्या निवडणुकीत रद्द करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जीएसटीमुळे व्यापारी देशोधडीला लागले आहेत. आमची सत्ता आल्यावर हा ‘कर दहशतवाद’ संपवणार असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्याचे भाजपाचा षडयंत्र आहे. महाराष्ट्राबद्दल असलेल्या आकसातून हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी या प्रचारात केला.
राम मंदिरावरून भावनिक राजकारण करणार्या भाजपाने राष्ट्रपती द्रोपदीमुळे यांना सोहळ्यासाठी का बोलावले नाही? त्या आदिवासी म्हणून त्यांना डावलले का? असा सवाल त्यांनी प्रचारात केला. राम मंदिर हे मोदींच्या नाही तर न्यायालयाच्या निर्णयानंतर झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर, मोदी सरकारकडून सुरू असलेल्या फसव्या जाहिरातींचाही समाचार घेतला. पंतप्रधान आवास योजना, गॅस योजना या फसव्या योजना असून त्यातून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपल्या मुलांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वसईतील सभेत केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले कि, आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता तर आपल्याघरातील आपले सुपुत्र काय करतात आणि तुम्ही बोहल्यावर नवरदेवासारखे का चढला? असा सवाल केला. गुजरात डँगली नंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचे आपणास सांगितले होते. त्यावेळी आपल्या मागे शिवसेना प्रमुख उभे राहिल्याने आज आपण हे दिवस बघत आहात. त्याच सेना प्रमुखांच्या मुलाला आणि शिवसेनेला नकली बोलता. हे तुमचे राजकारण, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शेवटी केली.
प्रफुल्ल पटेल यांच्या कृतीचा निषेध प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींना जिरेटोप घातली. यावरून विरोधक टीका करत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या कृतीचा ठाकरेंनीही निषेध केला. प्रफुल्ल पटेलचा अर्ज भरायला नरेंद्र मोदी गेले होते. पटेल तुम्ही लाचार झालात, मोदींच्या चरणी लीन होताना महाराजांची टोपी डोक्यावर ठेवतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवरही जोरदार टीका केली आहे.