काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचे काम देण्याचा विचार काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगामी विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याबाबतचा विचार हा विधानसभा निवडणुकीनंतर केला जाईल. त्यामुळे फक्त प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, असा विचार काँग्रेसकडून समोर आला आहे. तर यामध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याचे काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण करणार आहेत. उद्या महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला संयुक्त मेळावा होणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार का? याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत घोषणा केली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.